लाडके मराठी लेखक पु.ल.भाई जन्मदिन 8 नोव्हेंबर
लाडके मराठी लेखक पु.ल.भाई जन्मदिन 8 नोव्हेंबर
मराठी साहित्यातलं शुभ्रधवल सारस्वत नाव म्हणजे सर्वांचे लाडके पु.ल.अर्थात पुरूषोत्तम लक्ष्मण देशपांडे ,ज्यांना आपण सारे भाई नावाने ओळखतो.कुठल्याही वाचकाने वा लेखकाने पुल कवेत घेणे म्हणजे अवकाश कवेत घेण्याचा प्रयत्न होय.साहित्य लेखनातला कविता,कादंबरी, नाटक,अनुवाद,चरित्र लेखन असा प्रत्येक प्रकार ,चित्रपट क्षेत्रातलं दिग्दर्शन ,अभिनय,संवाद लेखन,संगीत संयोजन,गायन,वादन असं सारं काही भाईंनी समर्थपणे पेललं आहे.त्यांचं पेलणं हे वेळ निभावणं या प्रवर्गातलं नसून जिथं हात लावला ,त्याचं सोनं केलं या प्रकारातलं आहे.कादंबरीकार,कथाकार,नाट्यकार,उत्तम वक्ता याहीपेक्षा पुढे जाऊन म्हणाल तर बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊली या श्रेणीतला कृतीशील समाजसेवक म्हणून भाईंची ओळख आहे.महाराष्ट्राचे लाडके पुल ही बिरूदावली घेऊन ते बिनधास्त ,महामूर ,मनमुराद जगले कारण या बिरूदावलीत लोकांनी त्यांना मनापासून आलंकृत केले होते.देशात आणि परदेशात आजही भाईंचे साहित्य हा हा म्हणता खरेदी केले जाते.
लाडके मराठी लेखक पु. ल.भाई जन्मदिन 8 नोव्हेंबर
आपण या जगात पोटार्थी म्हणून नव्हे तर आनंदयात्री म्हणून जन्माला आलो आहोत.असं पुल नेहमी सांगत.आनंदयोगी भाईंची जीवनाकडे पाहण्याची कलासक्त दृष्टी या विधानातून स्पष्ट होते.असा मी असामी ,अघळपघळ या काल्पनिक आत्मकथेतून पुल आपल्याशी बोलतात.त्यातून त्यांची जडणघडण कळते पण पुरचुंडीतले पुल हे थेट मनाशी मनात घर करून बोलतात.पुरचुंडीत बोलणारे पुल स्वतःची घडणावळ मांडतात तर तिकडे सुनीताताई आहे मनोहर तरी लिहिताना भाई जसा आहे तसा मांडतात.ना.धो.महानोरांचे आनंदयोगी पुल वाचताना तर पुल आकाशाएवढा असल्याचं कळतं. लेखनाच्या निमित्ताने स्नेह जडलेले पुल व ना.धो.कौटुंबिक मित्र बनले होते.पुलंचा जन्म मुंबई शहरातला ,त्यांचे राहणे घडले तेही मुंबई,पुणे शहरात पण महानोरांच्या घरी पुल जातात,तेव्हा मस्तपैकी शेतात फिरून येतात.घरी खाली सतरंजीवर बसून जेवण करतात.रानकवी महानोर या आपुलकीने भारावून जातात. हा संपूर्ण अनुभव आनंदयोगी वाचताना येतो.
लाडके मराठी लेखक पु.ल.भाई जन्मदिन 8 नोव्हेंबर . पुरूषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1919 मुंबईतला.शिक्षक व नभोवाणीतली पोटार्थीसाठी केलेल्या नोकरीचा कालखंड सोडला तर पुल केवळ अन् केवळ आनंदयात्री म्हणूनच जगले.पु.ल.च्या लेखनाचे वैशिष्ट्ये म्हणजे त्यांनी कधीच कुणालाही दुखावणारं लेखन केलं नाही.एखादी दुखरी नस त्यांनी एखाद्या निष्णात वैद्याप्रमाणे शस्त्रक्रियेच्या टेबलवर मांडली.अंतु बर्वा,चितळे मास्तर, परोपकारी गंपू सारख्या व्यक्तिरेखा भाईंनी अजरामर केल्या.कोकणातल्या एका खोपटात राहणाऱ्या अंतु बर्वाच्या अंधार खोलीत विद्युत दिव्याची सोय नाही.असुविधेच्या अप्राप्त्याची अंतुस कसलीच खंत नाही.उलट तो म्हणतो वीजेचा झगमगाट नाही .तेच बरे आहे.उगीच वीजेमुळे घरातलं दैन्य दिसलं असतं.पु.ल.ची लेखणी ही अशी आहे.दुःखाला वाचा फोडताना हृदय द्रवते व डोळेही पाणवतात पण या दोन्ही क्रियेत कुठेही आक्रास्तळेपणा नाही; आहे ते फक्त हळुवार कुरवाळणं मग ते सुख असो वा यातना.
लाडके मराठी लेखक पु.ल.भाई जन्मदिन 8 नोव्हेंबर.
एका कोळियाने या अनुवादित पुस्तकाचा नायक हा एक वृद्ध म्हातारा आहे. हेमिंग्वेच्या समुद्रात तो मासेमारीसाठी गेलेला आहे. तीन महिने मासा गळाला लागत नाही.या तीन महिन्यात तो म्हातारा अनेकवेळा उपाशी राहिलेला आहे.एके दिवशी बोटीहूनही मोठ्या आकाराचा मासा गावतो परंतु म्हाताऱ्यात तो मासा ओढण्याचं त्राण नाही, तेवढ्यात एक मोठा शार्कही बोटीवर हमला करतो.उपाशी असलेला म्हातारा शार्क सोबत लढतो,गळाला लागलेल्या माशालाही ओढत राहतो.हा संघर्ष मुळ पुस्तकात वाचलाच पाहिजे. हा म्हातारा म्हणजे आपणच आहोत व समुद्र, मासा,शार्क ,बोट हा संसार आहे.गळाला लागलेलं गळून जाण्याचं,निसटून जाण्याचं गंडांतर संसारात भोगावं लागतं.
भाईंच्या स्वतःच्या साहित्य संपदेवर वीसहून अधिक चित्रपट बेतलेले आहेत.अकरा चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन स्वतः पुलंनी केलेले आहे.काही चित्रपटात अभिनेता म्हणून काम केले आहे.नाटकाचा रंगमंच तर पुलंशिवाय केवळ अपूर्णच आहे.असं हे सर्वत्र वावरणारं पुल वादळ हे घोंगावण्याच्या दृष्टीने सार्वत्रीक पण दरवळण्याच्या दृष्टीने अत्यंतिक सुगंधी होतं.
लाडके मराठी लेखक पु.ल.भाई जन्मदिन 8 नोव्हेंबर.
नाच रे मोरा आंब्याच्या बनात हे गाणं कोणी ऐकलं नाही ? या प्रश्नाच्या नाही उत्तराच्या बाजूने एकही देह नाही.गेल्या पाऊन शतकीय काळापासून हे गाणं थोरामोठ्यांच्या ,लहानग्यांच्या मनाचा ठाव घेतं.देवबप्पा चित्रपटातल्या या गीताला स्वतः भाईंनी संगीतबद्ध केलेलं आहे.यशाचं उच्च शिखर गाठणारी नाटकं पुलंनी दिली तसेच काही नाटकं बाळुत्यातून बाहेर आलीच नाहीत.पहिल्याच प्रयोगात ती सपशेल कोसळली.कलाकार म्हणून भाईंना त्याची खंत वाटली पण ते अपयशाला कुरवाळत बसले नाहीत.अपयशाला कुरवाळत न बसल्यामुळेच यशाने भाईची गुलामगिरी केली.
तुका म्हणे आता या नाटकाच्या अपयशाचा किस्सा सांगताना पुल म्हणत 8 नोव्हेंबर हा माझा वाढदिवस व माझ्या पहिल्या नाटकाची पुण्यतिथी.कारण तुका म्हणे आता नाटकाचा पहिला प्रयोग 8 नोव्हेंबर 1948 चा.
नट,कथालेखक,संगीत दिग्दर्शक अशा भूमिकेत स्वतः मी होतो.प्रेक्षकांनी नाटक डोक्यावर घेतलंच नाही.पण तरीही भाई पुढे म्हणतात ,वेड अंगात असलेला माणुस अपयशानं खचत नसतो.अपयशातूनच पुढं बटाट्याची चाळ जन्माला आली.
लाडके मराठी लेखक पु. ल.भाई जन्मदिन 8 नोव्हेंबर
समाजसेवी भाई हा पुलंतला खूप मोठा पैलू आहे.कुष्ठरोग्यांसारख्या बहिष्कृत लोकांसाठी बाबा आमटे अहोरात्र झटतात.बाबांबद्दल भाईला खूप आदर होता.भाई व सुनीताताई अनेकवेळा वरोरा येथील आनंदवनात जाऊन तिथल्या कुष्ठरोग्यांसोबत राहिली आहेत.तिथल्या नभांगणात चांदणं फुलविण्याचे काम भाई-ताईंनी केलं आहे.पुलंनी आनंदवनास वेळोवेळी केलेल्या मदतीचा उल्लेख स्व.साधनाताई आमटेंनी आपल्या समिधा आत्मचरित्रात केला आहे.हिमालयाची सावली म्हणून भाई बाबा आमटेंचा उल्लेख करत.आनंदवन हे एक प्रातिनिधीक उदाहरण झालं.पुलंनी अनेक सेवाभावी संस्थांना ,व्यक्तींना भरघोष मदत केलेली आहे.आनंदयोगी या पुस्तकात प्रसिद्ध निसर्गकवी ना.धो.महानोर यांनी भाईंच्या दातृत्वाचे काही किस्से मांडले आहेत.स्वतः ना.धो.महानोर अडचणीत असताना भाईंनी त्यांना मदत केली होती.
माणसं मिळवणं व ते टिकवणं हा भाईंचा छंदच होता.या त्यांच्या छंदामुळे व माणुसकीच्या जातीवंत निर्झर स्वभावामुळे वसंत सबनीस,लता मंगेशकर,ग.दि.मांडगुळकर,मा.शरद पवार ,स्व.यशवंतराव चव्हाण,स्व.बाळासाहेब ठाकरे आदि व्यक्तिमत्वासोबत पुल जोडले गेले.
लाडके मराठी लेखक पु.ल.भाई जन्मदिन 8 नोव्हेंबर
घरांबद्दलचं पुलंच मत म्हणजे घरंदाजपण आहे शिवाय अंगणं हरवत चाललेल्या घरपणावर हळुवार प्रहारही आहे.पुल म्हणतात घराच्या शोधामुळेच मानव मनुष्य न राहता गृहस्थी झाला.अविश्वासामुळे दारे कुलुपांचा जन्म झाला.गुहेतला माणुस घरातल्या गुहेत आला.अंगण हरवलं की घरपणही हरवतं .हे सांगताना पुलं त्यांच्या लहानपणीच्या घर अंगणाची गोष्ट सांगतात.
तरूणाई हा पुलंचा आवडता वर्ग.भाई म्हणतात मला नाचणारे तरुण आवडतात.अर्थात हे नाचणं उत्साह या अर्थाने अभिप्रेत आहे.अमुक एका तिथीला अमुक एका मुहुर्तावर आपण तारूण्यात पदार्पण केलं,असं सांगणं कठीण आहे.तारुण्य म्हणजे स्वप्नरंजनाचा काळ,तारुण्य म्हणजे प्रतिकूल परिस्थिती विरूद्ध दंड थोपटून उभे राहण्याची उमेद.
दूरदर्शन व नभोवाणीत नोकरी करत असताना तिथले अनुभव भाईंनी दोन खंडात लिहिले आहेत.यावरून त्यांच्या निरीक्षण क्षमतेची कल्पना येते.फ.मु.शिंदे यांना दिलेल्या मुलाखतीत एकूणच समाज विश्वावर प्रकाश टाकला आहे.सम्यक क्रांती हे एक स्वप्न होतं पण राजकीय व्यवस्थेने सम्यक क्रांतीचा मुडदा पाडला त्यामुळे आपसुकच सम्यक क्रांती स्वप्नाचा चुराडा झाला.
लाडके मराठी लेखक पु.ल.भाई जन्मदिन 8 नोव्हेंबर
लाडके मराठी लेखक पु.ल.भाई जन्मदिन 8 नोव्हेंबर
दू दूरदर्शन नुकतंच सुरू झालेलं होतं ,तेव्हा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची पहिली मुलाखत घेण्याचा मान पुलभाईला मिळाला होता.
भाई स्वतः राजकारणी नव्हते पण राजकारणावर भाष्य करणारे ते जाणते होते.मराठवाडा विद्यापीठ नामांतरवेळी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या भूमिकेचे जाहीर समर्थन केले होते.ज्ञान व कर्ममार्ग यांची सांगड घालून धुळीतून माणसं निर्माण करणारा महामानव म्हणून ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांकडे पाहत असत.मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेबांचे नाव असणे .ही बाब भुषणावह आहे.असं ते स्पष्टपणे मांडत.राज्यभाषा म्हणून मराठीच्या हेळसांडीवर त्यांनी शासनाचे लक्ष वेधून घेतले होते.प्रश्न केवळ भाषेचा नाही तर शिक्षण कशासाठी घ्यायचं ? हा आहे.ज्ञान संपादन हा शिक्षणाचा उदात्त हेतू असला तरी शिक्षणातून उदरनिर्वाहाची कला जोपासली गेली पाहिजे,असे त्यांचे स्पष्ट मत होते.
भटकंती हा पुल व सुनीताताई दोघांचाही खूप आवडता विषय.युरोपीय व पूर्व आशियाई देशातील त्यांची भटकंती अपुर्वाई ,पूर्वरंग या ग्रंथाने अजरामर केली आहे.तिथली माणसं ,लोकजीवन,व्यवस्था,पाहुणचार,संस्कृती,स्थळे वाचत असताना आपणही त्यांच्यासमवेत परदेश भ्रमण करत आहोत.असं दृश्य उभं, नव्हे जागं करण्याची ताकद भाईंच्या लेखनीत आहे.गणगोतमध्ये मांडलेली व्यक्तिरेखा ही भाईंच्या भोवतालची माणसं आहेत पण लिखानातली जादू अशी की ते सारंच गणगोत वाचकास स्वतःच गणगोतं वाटायला लागतं.
लाडके मराठी लेखक पु.ल.भाई जन्मदिन 8 नोव्हेंबर
नेहमीच दुसऱ्याचं कौतुक करणाऱ्या भाईंनी नसती उठाठेवमधून ,नको त्या उचापती करणारांची चांगलीच कान उघडणी केली आहे.नवोदितांना शाबासकी देणं हा पुलंचा खास गुण आहे.मग ते क्षेत्र रंगामंच ,समाजसेवा वा साहित्य काही का असेना.त्यांच्या कौतुक करण्याच्या प्रेरणेतून वसंत सबनीस सारखा अव्वल दर्जाचा नट घडला.ना.धो.महानोर सारखा शेतीनिष्ठ निसर्ग कवी घडू शकला.दाद हा कथासंग्रह भाईंनी अशा नवोदित लोकांना शाबासकी देण्यासाठीच लिहिला.कोसलाकार नेमाडे,आमचा बाप आणि आम्ही मांडणारे नरेंद्र जाधव यांना दाद कथासंग्रहातून भाईंनी विशेष शुभेच्छा दिलेल्या आहेत.शुभेच्छापर आशीर्वाद देण्यासाठी एखाद्या ग्रंथाची निर्मिती केवळ पुलच करू शकतात कारण निष्काम कर्मयोग शब्दाचं प्रात्यक्षिक भाई स्वतःच आहेत.म्हणूनच हे जमू शकलं.लेखन या एकाच प्रांतांत राहून वैरभावास खतपाणी घालणाऱ्या लेखकांच्या दुनियेत नवागतांना आशीर्वाद ही भाईंची कृती म्हणजे दीपस्तंभी वारसा आहे.चार शब्द या ग्रंथातून मांडलेले शब्दवैभव म्हणजे प्रेरणेची सुरेख रांगोळी.
लाडके मराठी लेखक पु.ल.भाई जन्मदिन 8 नोव्हेंबर.
लाडके मराठी लेखक पु.ल.भाई जन्मदिन 8 नोव्हेंबर
व्यक्ती आणि वल्ली ,आपुलकी गणगोत ,गुण गाईन आवडीने ही पुस्तके म्हणजे भाईंची समाजमन उठावदार करणारी रांगोळी आहे.या पुस्तकातल्या व्यक्तिरेखा आपल्या भोवतीलच आहेत.ही जादू भाईंची आहे.अमाप लेखन करूनही भाई नेहमी जमीनीवरच राहिले.सुरूवातीच्या काही काळात त्यांनी लेखन तंद्री भंग पावू नये म्हणून लेखन काळात भेटीगाठी नाकारल्या होत्या पण माणसाच्या वाऱ्याची हवा प्यालेले भाई माणसांपासून दूर राहू शकत नव्हते.मनुष्य संघटन स्वभावामुळे भाईला आर्थिक धोके खूप वेळा झाले.एखाद्या चित्रपटातून किती कमावले यापेक्षा कुणी किती बुडविले ,हाच हिशेब मोठा होता.हसवणुकमध्ये भेटलेले भाई चांगल्या वाईटाची गोळाबेरीज समर्थपणे मांडतात.
लाडके मराठी लेखक पु.ल.भाई जन्मदिन 8 नोव्हेंबर .
मुलबाळ नसलेले पुलं रक्तबंधनातून अपत्य सुखाला मुकले असले तरी नाट्य,चित्रपट,लेखन सृष्टीने त्यांना असंख्यांनी मायबाप या धनाचा आनंद लुटायला दिला.
आहे मनोहर तरी मधून मांडलेला भाई मनाला खूप भावतो .कारण भाईंचे ते अनमोल मोल जसं आहे तसं स्वतः सुनीताताईंनी मांडलं आहे.सामान्य माणसाच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणारं लेखन भाईंनी केलं आहे.प्र.के.अत्रेंसारखा वक्ता जसा दहा हजारातून एखादा जन्माला येतो ;त्याच धर्तीवर भाषाप्रभुत्व असलेला पुलसारखा सारस्वतही दहा हजारातून एखादाच जन्माला येतो.असं मला वाटतं.पुल या भाग्यवानाच्या भावगंधानेच मराठी साहित्य पुनित झालेले आहे.वपुमय होणं हे जसं साहित्यात विरघळणं आहे तसं पुलकित होणं हे साहित्याचा मुरमुर अर्क पिल्यासारखं आहे.
लाडके मराठी लेखक पु.ल.भाई जन्मदिन 8 नोव्हेंबर.
महाराष्ट्राच्या लाडक्या भाईने 12 जून 2000 रोजी आपला देह ठेवला.खरं तर हा दिवस पुलभाई व सुनीताताई यांच्या लग्नाचा 54 वा वाढदिवस होता पण या दोघांची दीर्घ संगत तोडण्यावर नियती ठाम होती. ऐंशी वर्षाच्या सारस्वताला पंच्याहत्तरीतली सारस्वत सोबतीण अर्ध शतकाहून अधिक काळ सहवास देऊन अलविदा करणार होती. पुढे नऊ वर्षांनी सुनीताताईंचा मृत्यूही पुलंच्या जन्मदिनाच्या एक दिवस आधी झाला.
भाईचे जाणे म्हणजे सर्वच क्षेत्रासाठी पोकळी होती.
लाडके मराठी लेखक पु.ल.भाई जन्मदिन 8 नोव्हेंबर
लाडके मराठी लेखक पु.ल.भाई जन्मदिन 8 नोव्हेंबर
मला एक आनंदाची गोष्ट सर्वांना सांगायची आहे ,ती म्हणजे मी भाई व सुनीताताईंना भेटलेलो आहे.साहित्यातल्या हिमालयाच्या सावलीत मी तासभर विसावलेला आहे.
पुलमय होऊन पुलकित होणं .या भावनेस शब्दात मांडणे न होणे कारण असा कुबेर भाई आपल्या बिऱ्हाडात पुन्हा लाभणं दुर्लभच.
लाडके मराठी लेखक पु.ल.भाई जन्मदिन 8 नोव्हेंबर विनम्र अभिवादन.
कचरू सूर्यभान चांभारे बीड 431122
मोबा.9421384434
chambhareks79@gmail.com
सर
समग्र पुल अतिशय कमी वेळात मांडले.
पुल अजून असतें तर दाद भाग 2 मध्ये तुम्ही नक्की असता.
मनस्वी धन्यवाद दादा पुल माझे आवडते लेखक
काय सुंदर लिहिले आहे सर….नशीबवान आहात…..
मनःपूर्वक धन्यवाद साहेब
जबरदस्त लेखप्रपंच da💐👌👌👌
मनस्वी धन्यवाद
अप्रतिम… 👍
मनस्वी धन्यवाद आचार्य
सुंदर लेख
मला एक आनंदाची गोष्ट सर्वांना सांगायची आहे ,ती म्हणजे मी भाई व सुनीताताईंना भेटलेलो आहे.साहित्यातल्या हिमालयाच्या सावलीत मी तासभर विसावलेला आहे.
म्हणूनच आपल्या लेखनात जबरदस्त प्रभावीपण आहे.
खूप जबरदस्त लेखन सरजी
खुप छान माहिती दिलीत सर
Nice